परिचय

सार्वजनिक आरोग्य ही सुराज्याच्या कल्पनेची एक महत्वाची बाब आहे. महाराष्ट्र राज्यात प्राथमिक आरोग्य सुविधा पूरविण्याची जबाबदारी जरी सार्वजनिक आरोग्य विभागाची असली तरी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून केवळ ॲलोपॅथी (Allopathy) तथा आधुनिक विज्ञान (modern science) या चिकित्सा पध्दतीद्वारे उपचार केले जातात.

तथापि वैद्यकीय शिक्षण, आयुष (AYUSH) (आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द व होमिओपॅथी चिकित्सापध्दत) आणि अन्न व औषध प्रशासन या उपविभागाकडून राज्यातील जनतेस प्राथमिक आरोग्यासह औषधोपचार, विशेषोपचार व अतिविशेषोपचार सेवा देण्यात येते.

या विभागाच्या अधिनस्त वैद्यकीय सेवा व व्यवसाय या संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करणे, मानवी जीवनाच्या प्रक्रियेमध्ये मानवाच्या शारिरिक, मानसिक, जन्मजात निर्माण होणारे आजार, अपघात, हवामानातील होणाऱ्या बदलामुळे निर्माण होणारे संसर्गजन्य रोग इ. निर्माण होणाऱ्या आजारावर मात करुन मानवी जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राशी निगडित संशोधन, उपाय योजना, वैद्यकीय शिक्षण, औषध निर्मिती व आनुषंगिक कायदे, या प्रयोजनार्थ आवश्यक वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ निर्माण करणे तसेच राज्यात वैद्यक शास्त्रात समतोल विकास साधणे व वैद्यक शाखेतील विविध अभ्यासक्रमात एकरुपता आणणे इ. संदर्भातील धोरणात्मक निर्णय घेतले जातात.