आयुष संचालनालय
आयुर्वेदीक व युनानी औषधी पध्दती
(एक) प्रास्ताविक:
आयुष संचालनालयाकडून आयुर्वेद, युनानी, होमिओपॅंथी, योगा, सिद्ध या शासनमान्य चिकित्सा व औषध उपचार पद्धती संदर्भातील नियंत्रण करण्यात येते. आयुर्वेद संचालनालयाचे विभाग प्रमुख हे संचालक असून त्यांना सहायक संचालक (आयुर्वेद) (वर्ग-१), व उपसंचालक (होमिओपॅथी) (वर्ग-१), सहाय्यक संचालक आयुर्वेद (वर्ग-१), मुख्य प्रशासकीय अधिकारी (वर्ग-१), प्रशासकीय अधिकारी (वर्ग-२), लेखा अधिकारी (वर्ग-२) व सहाय्यक लेखा अधिकारी (वर्ग-३) हे संचालनालयाच्या कामकाजात सहाय्य करतात. मुंबई, पुणे व नागपूर येथे प्रत्येकी एक अशी ३ सहाय्यक आयुर्वेद संचालकाची कार्यालये कार्यरत असून ते प्रादेशिक कार्यालय प्रमुख म्हणून काम करतात. या व्यतिरिक्त पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयांमध्ये २० रुग्णांची सोय असलेल्या आयुर्वेदिक संशोधन कक्षासाठी एक निवासी वैद्यकीय अधिकारी असून रा. आ. पोदार महाविद्यालय, मुंबई येथे तसेच नागपूर, नांदेड व उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, व संलग्नीय रुग्णालयाचे कामकाज पाहण्याकरीता चार कार्यालय प्रमुख (अधिष्ठाता) आहेत.
आयुर्वेदीय, युनानी निसर्गोपचार व योगा पध्दती आणि होमिओपॅथी औषधोपचार या संबंधीचे शिक्षण व संशोधन याबाबतचे सर्व काम या संचालनालयाचे अखत्यारीत येते. स्थूलमानाने संचालनालयाचे क्रियाशील कार्यक्रम खालील प्रमाणे आहेत : -
(१) आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी:- निसर्गोपचार व योगा औषधी पद्धती बद्दलचे शिक्षण:- भारतीय औषधांच्या मध्यवर्ती मंडळाने तयार केलेला बी.ए.एम्.एस्. (आयुर्वेदाचार्य) हा अभ्यासक्रम शिकवीत असलेली मुंबई, नांदेड, नागपूर व उस्मानाबाद येथे प्रत्येकी एक अशी एकूण ४ शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालये व १६ खाजगी अनुदान प्राप्त आयुर्वेद महाविद्यालये आहेत. तसेच बी. यू. एम्. एस. हा पदवी अभ्यासक्रम चालविणारे तीन युनानी अनुदान प्राप्त महाविद्यालये आहेत. तसेच ३ खाजगी विना अनुदान युनानी महाविद्यालय व ६० खाजगी विना अनुदान आयुर्वेदिक महाविद्यालये आहेत या व्यतिरिक्त एकूण ५६ खाजगी होमिओपॅथीक महाविद्यालये आहेत. शासकीय व खाजगी आयुर्वेद, युनानी, होमियोपॅथीक महाविद्यालयांची संख्या व त्यांची विद्यार्थी प्रवेश क्षमता खालील प्रमाणे दर्शविली आहे.