प्रस्तावना :
राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत दि.१८/०३/१९९१ रोजी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. संस्था महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत कार्यरत आहे. सदरील संस्था ही मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन व मनुष्यबळ निमिर्तीचे कार्य करणारी शासनाची अग्रणी संस्था आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय मार्फत या संस्थेची मानसिक आरोग्य क्षेत्रात “सेंटर ऑफ एक्सलन्स” म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सध्या संस्थेचे मुख्यालय ससून सर्वोपचार रुग्णालय परिसर, पुणे येथे असून मनोविकृतीशास्त्र विभाग बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या सोबत ही संस्था संयुक्तरीत्या कार्यरत आहे.
संस्थेमार्फत मनोरुग्णांना विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात. बाह्यरुग्ण विभागामध्ये प्रत्येक वर्षी सरासरी ५,००० नवीन मनोरुग्ण व ५०,००० जूने रुग्ण उपचार घेतात. प्रति वर्षी जवळपास १,३०० आंतररुग्ण मनोरुग्णांना संस्थेमार्फत सर्वसमावेशक सेवा देण्यात येते. संस्थेकडून मतीमंदत्व व मानसिक अपंगत्व असलेल्या दिव्यांगजनांना प्रमाणपत्रासाठी आवश्यक ती सेवा दिली जाते. मनोरुग्णांकरीता संस्थेमार्फत दिनकेंद्र सेवा दिली जाते. त्यामध्ये पूर्वव्यावसायिक व सामाजिक कौशल्य विकसित करण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाते.
प्रशिक्षित मनष्यबळाची कमतरता भरुन काढण्याकरिता शासनाच्या मान्यतेने व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संलग्नित मानसिक आरोग्याशी निगडीत विविध पाठक्रम संस्थेमार्फत चालविण्यात येतात. मानसिक आरोग्याशी निगडीत परावैद्यकीय व्यावसायिकांना (परिचारिका, समुपदेशक, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता) संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
कोविड-१९ ची पार्श्वभूमी लक्षात घेता संस्थेमार्फत “मनसंवाद” ही सायकोलॉजीकल हेल्पलाईन दिनांक ३१/०३/२०२० रोजी पासून सुरु करण्यात आली आहे. या मध्ये कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचे निरसन व मार्गदर्शन करण्यात येते. मानसिक आरोग्याशी निगडीत विविध प्रकारचे संशोधन संस्थेमार्फत करण्यात येते.
मौजे पाषाण येथील संस्थेच्या मालकीच्या जागेवर संस्थेमार्फत अद्यवयात असे मानसिक आरोग्य संकुल उभारण्यात आले असून संस्था नजिकच्या काळात सदर संकुलात स्थलांतरीत होणार आहे.